सांगली - सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीद वाक्याची प्रचिती वाळवा तालुक्यातील नागरिकांना अनुभवायला मिळाली. कर्तव्यावर नसतानादेखील एका पोलीस कॉन्टेबलने गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. वाळवा येथील एका वृद्ध महिलेचे मंगळसुत्र चोरून नेणाऱ्या दुचाकीवरील चोरट्यांचा पाठलाग करून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास मदत केली आहे. राजेंद्र देवळेकर असे त्या कर्तव्यनिष्ठ पोलिसाचे नाव आहे.
राजेंद्र देवळेकर हे वाळवा गावचे असून वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस स्टेशनला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. शनिवार (दि.11) देवळेकर हे साप्ताहिक सुट्टी असल्याने आपल्या वाळवा नागठाणे रोड लगत असणाऱ्या शेतात काम करत होते. या वेळेस सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास याच रस्त्याने मालती नेमगोंडा पाटील (वय 78) या नातवासोबत शेतातून घरी जात होत्या. त्यावेळी ३ अनोळखी दुचाकीस्वार तोंडाला रुमाल बांधून आले व मालती यांना कोल्हापूरकडे कसे जायचे, हे विचारू लागले. त्याचवेळी आजू बाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांच्यातील एकाने आजीच्या गळ्यातील 4 तोळ्याची मोहन माळ तोडली.
मालती यांनी आरडा ओरडा केला. मात्र, तोपर्यंत हे तिघांनी दुचाकीने पळ काढायला सुरुवात केली. मालतीबाईंचा आरडा-ओरडा ऐकून जवळच शेतात काम करणाऱ्या देवळेकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यावेळी मालतीबाईंनी मंगळसुत्र चोरीची माहिती देताच देवळेकरांनी त्या तिघांचा मोटारसायकल वरून पाठलाग केला. पाच सहा किलोमीटर दूर गेल्यावर या तिघांनी देवळेकरांच्या गाडीवर दोन वेळेस लाथाही मारल्या. पण देवळेकर घाबरले नाहीत, अशा गडबडीत त्यांनी आष्टा पोलिसांना फोनही केला शिवाय देवळेकर यांनी आपले सहकारी पो.ह. सूर्यकांत कुंभार यांना व्हिडिओ कॉल केला, हा सर्व थरारक पाठलाग लाईव्ह सुरू ठेवला. हवालदार कुंभार यांनीही त्यांना त्यांचा पाठलाग करण्यासंदर्भात सूचित केले.
अखेर २० किमी अंतर पार पडल्यानंतर त्या तीन चोरांनी देवळेकर आपल्याला सोडणार नाही, या विचाराने गाडी रस्त्यावर टाकून उसातून पळ काढला, देवळेकर यांनी आष्टा पोलिसांना बोलावून गाडी ताब्यात दिली.
देवळेकरांच्या गाडीतील पेट्रोल संपत आले होते, यावेळी हे चोर आणखी दोन किलोमीटर गेले असते तर ते सुटू शकले असते. आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निभोरे सपोनि ढोरे पो. उप निरीक्षक ढेरे स. पो. फौजदार सनदी व पो को जाधव पाटील आष्टा बिट मध्ये असलेले स्थानिक गुन्हा अन्वेषण सांगली यांचे कडील साळुंखे पो ना खोत, धोत्रे या टीमने घटनास्थळी येऊन गाडी ताब्यात घेतली आणि निभोरे यांनी दोन टीमच्या माध्यामातून वाळवा गावात व परिसरात माहिती काढून अवघ्या आठ तासात या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. परंतु देवळेकर यांनी एकटे असताना ही आपल्या जीवावर उधार होऊन दाखवलेला धाडसीपणामुळे राजेंद्र देवळेकरावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या गाडीत पेट्रोल किती आहे किंवा ते तिघे असल्याने आपल्या जीवितास धोखा होऊ शकतो याचा विचार ही देवळेकर यांनी केला नाही, यावरूनच त्याच्यातील कर्तव्य निष्टेची उर्मी दिसून येते... यामुळे सध्या वाळवा व परिसरात देवळेकर यांनी केलेल्या पाठलागाचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.