सांगली - जिल्ह्यातील कुरळप गावात व परिसरातील गावांमध्ये भुरट्या चोरट्यांचा वावर वाढला आहे. कुरळपमध्ये दोन दिवसांपूर्वी येलूरला जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील सोयाबीनची 9 पोती रातोरात लंपास केली होती. मागील काही महिन्यांपासून परिसरातील गावातील चोरीचे प्रमाण वाढले आहे.
सध्या कोरोनामुळे व्यापारीवर्ग व शेतकरी यांची आर्थिक घडी बिघडली असताना त्यांना भुरट्या चोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सुगीचे दिवस चालू असल्याने शेतांमधून सोयाबीन मळणी, भुईमूग काढणीचे कामे सुरू आहेत. त्यातच वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी मळलेले धान्य शेतातीलच शेडमध्ये ठेवत आहेत. यावरच चोर डल्ला मारत आहेत.
पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी
कुरळपमध्ये पोलीस स्टेशन आहे, पोलिसांनी लवकर कारवाई करावी व रात्रीचा बंदोबस्त वाढविण्याची ग्रामस्थांमधून मागणी होत आहे. मागील काही महिन्यांपासून कुरळपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरी झाल्याचे समजते. मात्र पोलिसांच्या उलट तपासणीला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थ तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत. यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीव्ही संच चोरीला गेला आहे. स्मशानभूमी येथील कुपनलिकेची इलेक्ट्रिक मोटर चोरीला गेली आहे. कुरळप पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या 21 गावांत चोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज असल्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील यांनी सांगितले.