सांगली - एकरकमी एफआरपी न देणाऱ्या साखर कारखानदारांच्या पुतळ्याचे दहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांच्याविरोधात आंदोलन छेडले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये नांद्रे येथे साखर कारखानदारांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला आहे.
एकरकमी एफआरपीला केराची टोपली -
सांगली जिल्ह्यात उसाचा हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिला नाही. साखर कारखाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक नोव्हेंबर 2020 मध्ये पार पडली, ज्यामध्ये एकरकमी एफआरपी देण्याबाबत सर्व कारखान्यांनी मान्य केले होते. यापैकी केवळ जिल्ह्यातल्या तीनच कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित 13 कारखान्यांकडून एक रकमी एफआरपी देण्याबाबत आडमुठी भूमिका घेण्यात येत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून साखर कारखानदारांच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडण्याचा भूमिका जाहीर करण्यात आली होती. मात्र, तरीही साखर कारखानदारांच्याकडून एकरकमी एफआरपी देण्याबाबत भूमिका घेण्यात आली नाही.
स्वाभिमानीचे ऊस आंदोलन सुरू -
सांगलीच्या नांद्रे या ठिकाणी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील एकरकमी एफआरपी न देणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये एफआरपी न देणाऱ्या कारखानदारांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी साखर कारखान दारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यापुढे गावागावात साखर कारखानदारांच्या पुतळ्यांचे दहन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे, त्याचबरोबर संबंधित साखर कारखानदारांची साखर जप्त करण्यासाठी साखर आयुक्तांच्यावर दबाव टाकण्याची भूमिकाही स्वाभिमानी शेतकरी संघटना घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये एफआरपी न देणारे साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे.