सांगली - प्राथमिक आरोग्य केंद्र हेच आपले केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करणे हे या पुढचे कार्यक्रम असतील,अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित सरपंच कार्यशाळा आणि रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
सरपंच कार्यशाळेतून कोरोनाबाबत मार्गदर्शन...
कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोना आरोग्यविषयक सरपंच कार्यशाळा आणि 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता.राज्याचे जलसंपदा व पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्ह्यातील 14 ग्रामपंचायतींना अद्ययावत अशा 14 रुग्णवाहिका मंत्री जयंत पाटील आणि मंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. यावेळी आयोजित समारंभात जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी ऑनलाइनद्वारे कोरोनाबाबतीत गाव पातळीवर कशा पद्धतीची खबरदारी घेणे गरजेचे आहे, याबाबत सरपंचांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा - समितीच्या शिफारशीनंतरच बदल्या होतात हे फडणवीसांना माहीत नाही?
मार्गदर्शन,रुग्णवाहिका आधार...
मंत्री जयंत पाटील यांनी बोलताना, कोरोना परिस्थितीत आरोग्यविषयक सरपंच कार्यशाळा व ग्रामपंचायतींना देण्यात येत असलेल्या रुग्णवाहिका या ग्रामीण भागासाठी मोठा आधार देणाऱ्या ठरणार आहेत.राज्यात कोरोनाच्या परिस्थितीनंतर आरोग्याच्या बाबतीत अनेक गोष्टी समोर आल्या.त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने आवश्यक ती, पावले उचलण्यात आली.
हेही वाचा - बदली रॅकेटप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, भाजपची मागणी
अर्थसंकल्पात आरोग्यावर भर
नुकतेच राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्यविषयक गोष्टींसाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे.या परिस्थितीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र किती महत्त्वाचे आहेत,हे सुद्धा समोर आले आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र हेच केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शाळा सुधारणेच्या धर्तीवर आरोग्य केंद्र ही सक्षम करण्यासाठी या पुढचे धोरण असेल, त्याचं पहिलं पाऊल हे प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिका आहेत,असे मत मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.