सांगली - राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात भाजपचे आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे नाव समोर आले आहे. मात्र, देशमुख यांनी कोणत्याही प्रकारे यामध्ये आपला सहभाग व थकीत देणे नसल्याचा खुलासा केला आहे. तसेच याबाबतची सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यावेळी बँकेकडे आणि न्यायालयाकडे सादर केल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
राज्य सहकारी बँकेतील 2500 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह तत्कालीन राज्य बँकेचे संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष, संचालकांसह 51 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या यादीत पूर्वीचे राष्ट्रवादीचे नेते व सध्याचे भाजपाचे आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे नाव समोर आले आहे.
मात्र, देशमुख यांनी त्यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जे कर्ज घेतले होते, त्याची परतफेड केल्याचा दावाही देशमुख यांनी केला आहे. 2013 मध्येच राज्य सहकारी बँकेकडून कर्ज फेडल्याचे आणि कोणतेही थकीत नसल्याचे पत्र सुद्धा मिळाले आहे. त्यामुळे आपले नावे कसलेही थकीत कर्ज नसल्याचे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले आहे.