मुंबई - 'पुष्पा 2' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आजवरचे सर्व विक्रमांना मागे टाकत या चित्रपटानं भरपूर गल्ला जमवला. कोविडच्या काळानंतर प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांच्या कमाईहून पुष्पा 2 नं अधिक कमाई केली आहे. असं असलं तरी बाहुबली 2 हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये अजूनही शीर्षस्थानी आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर दोन नेत्रदीपक आठवडे पूर्ण केले आहेत.
'पुष्पा 2'ची 14 व्या दिवसाची कमाई
'पुष्पा 2' जगभरात 1500 कोटी रुपयांच्या कमाईच्या दिशेनं वाटचाल करत आहे आणि लवकरच हा चित्रपट भारतात 1000 कोटींचा टप्पा पार करणार आहे. हे निश्चित आहे की 'पुष्पा 2' आजच्या 15 व्या दिवसाच्या कमाईसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपयांचा गल्ला गोळा करण्यात यशस्वी होईल.
'पुष्पा 2'च्या 14 व्या दिवशीच्या कमाईबद्दल बोलायचं तर सकनिल्कच्या अहवालानुसार कमाईत 10.92 टक्क्यांची घट झाली आहे. 'पुष्पा 2'चित्रपटानं 14 व्या दिवशी भारतात 20.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, देशी बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'चं एकूण कलेक्शन 973.65 कोटी रुपये झालं आहे.
'पुष्पा 2' हा 2024 साली ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं ऑस्ट्रेलियामध्ये 4 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला आहे.
'पुष्पा 2' भारतात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
'पुष्पा 2' हा केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरणार आहे. 'पुष्पा 2'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 14 दिवसांत अंदाजे 1500 कोटी कमावले आहेत आणि चित्रपटाकडे अजून एक आठवडा शिल्लक आहे, ज्यामध्ये 'पुष्पा 2'ची कमाई वाढणार आहे. दंगल (2000 कोटींहून अधिक) आणि बाहुबली 2 (1800 कोटींहून अधिक) चं रेकॉर्ड मोडत 'पुष्पा 2'भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे.