सांगली - लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मॉन्सून तोंडावर असल्याने शेतीकामे रखडली होती. मात्र, मॉन्सूनला अगदी काहीच दिवस उरले असल्याने शेतकऱ्यांनी मास्क वापरून, सोशल डिस्टंस राखत पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकरी शेत पेरणीसाठी तयार करत आहेत.
सध्या वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांची शेती मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे. सोशल डिस्टंन्स राखत शेतकरी तोंडाला मास्क लावून भात पेरणीसाठी शेतातील घाण वेचण्याचे काम सुरू आहे. सांगली, वाळवा व शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्या शेती मशागतीसाठी धांदल उडाली आहे. शिराळा तालुक्यात सत्तर टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सऱ्या पाडून सोयाबीन, भुईमूग यासारख्या पिकांची टोकन करण्यासाठी पाऊसाची वाट पाहत आहेत. तर काही गावात ऊस लावणीला सुरुवात झाली आहे.
मे महिन्याच्या रोहिणी नक्षत्रानंतर भात पेरणी केली जाते. पण चालू वर्षी गेल्या पंधरवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात पिकाची पेरणी उरकून घेतली आहे. सध्या कोरोनाच्या भीतीने शेतात मजूर मिळत नसल्याने कांदे मांगले येथील शेतकऱ्यांनी स्वतः पेरणी अवजारे ओढत घरगुतीच भात पेरणीचे कामे करणे पसंद केले आहे.