सोलापूर - अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टर 25 हजार रुपये आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी आज (25 नोव्हेंबर) दुपारी शिवसेनेच्या वतीने विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
राज्यपालांच्या आदेशानुसार देण्यात येणारी हेक्टरी 8 हजार रुपये नुकसान भरपाई ही अतिशय तुटपुंजी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. पावसाच्या उघडीपीच्या काळात शेतकर्यांनी शेतातील खरब झालेली पिके काढून टाकली. त्यामुळे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. पीक पाहणीच्या आधारे पंचनामे न करता 7/12 वरील पीकांच्या नोंदीवरून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी या शिवसैनिकांनी केली आहे. त्यासोबतच पीकविमा कंपन्यांनी पंचनाम्यानुसार 100 टक्के नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 25 हजारांची मदत द्या; शिवसेनेचा जळगाव तहसील कार्यालयावर मोर्चा
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. मिलींद कदम यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले.