सांगली - अभिनेत्री कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सांगलीतील शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना आणि महाराष्ट्र सरकार असा वाद सुरू असून, तो वाद विकोपाला गेला आहे.
हेही वाचा - भाजपचे वरिष्ठ नेते, माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन
मुंबई, महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलीस दल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कंगनाकडून बेताल आरोप करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या सांगली शहरातील महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात राहून मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचा उद्योग कंगनाकडून झाला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी टीकाही कंगनाकडून करण्यात आली होती. त्यामुळे अभिनेत्री कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सांगलीच्या शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आली आहे.
याबाबत माजी नगरसेविका पद्मिनी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगना रणौतविरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करत या पुढील काळात कंगनाकडून बेछूट आरोप चालूच राहिले तर तिच्या विरोधात शिवसेना महिला रस्त्यावर उतरून कंगनाला धडा शिकवेल, असा इशारा देण्यात आला आहे.