सांगली - मृत्यू अटळ आहे,पण तरीही प्रत्येकजण स्मशानभुमी पासून चार हात लांब राहणे पसंत करतो,अंत्यविधी व्यतिरिक्त याठिकाणी फारसं कोणी जाण्यासाठी धजावत नाही.कारण भूत, पिशाच्च अशा अंधश्रद्धेचे भूत समाजाच्या मानगुटीवर आहे आणि समाजातील ही भीती दूर करण्याच्या उद्देशाने चक्क स्मशानभूमीतंच पारायण सोहळ्याचे आयोजन सांगलीच्या आष्टा येथे आयोजित करण्यात आले होते. गावातील वीरशैव लिंगायत समाजाने एकत्रित येऊन स्मशानभुमीचे जीर्णोद्धाराच्या निमित्ताने स्मशानभूमीत सामूहिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला.
या पारायण सोहळ्यात गावातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. तीन दिवस आष्टा-मर्दवाडी रोडवरील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत हरी नामाचा जप सुरू होता. इतकंच नव्हे तर या स्मशानभूमीत स्नेहभोजनाचा ही कार्यक्रम संपन्न झाला. त्याच बरोबर या स्मशानभूमीत पूर्वजांच्या थडग्यावर ठेवण्यात आलेली दगडं काढून टाकत थडग्यांवर शतावरी व चिंचेच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच काढण्यात आलेल्या दगडांच्या माध्यमातून स्मशानभूमीत एक छोटेसे शिवमंदिर उभारण्यात येणार आहे.तसेच इतर समाजाने या या उपक्रमातुन स्फूर्ती घेतला पाहिजे, असे मत या उपक्रमाचे आयोजक प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.
समाजामध्ये स्मशानभूमीच्या बाबतीत असणारे समाज गैरसमज दूर व्हावेत या उद्देशाने प्रकाश महाजन यांनी स्मशानभूमीत पारायण सोहळा आयोजित करण्याची भूमिका घेतली. सर्व लिंगायत समाजाने एकत्रित येऊन हा नवा उपक्रम यशस्वी करून दाखवला. तर अनेकांनी आपल्या मनात असणारी स्मशानभूमीच्या बाबतीत असणारी भीती दुरु झाल्याचे आवर्जुन सांगितले.
एकविसाव्या शतकात वावरताना स्मशानभूमीच्या बाबतीत आजही समाजात मोठी अंधश्रद्धा पाहायला मिळते. मात्र लिंगायत समाजाने स्मशानभूमीत पारायण सोहळा घेऊन अंधश्रद्धेला छेद देणाऱ्या एक क्रांतिकारक पाऊल टाकले आहे, हे नक्की.