सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुक्याचे नेते व माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथे अज्ञातांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... पत्नीच्या पाठोपाठ पतीची आत्महत्या; तीन वर्षाचा चिमुरडा ठरला निमित्त
सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील देशींग येथील बोरगाव रस्त्यावर थांबले असता, अचानक काही अज्ञातांनी येऊन पाटील यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला चढवला. मनोहर पाटील यांना गंभीर जखमी करत हल्लेखोर पसार झाले. यानंतर तिथे असणाऱ्या ग्रामस्थांनी पाटील यांना तातडीने मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर जखमी झाल्याने पाटील यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
हेही वाचा... शीना बोरा हत्याकांड : मुंबई उच्च न्यायालयाकडून पीटर मुखर्जीला जामीन मंजूर
मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असणारे पाटील हे त्या गावचे उपसरपंच राहिले आहेत. तसेच 2017 मध्ये पंचायत समिती सदस्यपदाची निवडणूक लढवत ते विजयी झाले होते. त्यानंतर कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापतिपदही पाटील यांनी भूषवले आहे. सध्या पाटील हे कवठेमहांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याचे संचालक होते. त्यांच्या खुनाच्या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा... 'मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी'
मनोहर पाटील यांच्या हत्या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे. चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांच्या हत्येची घटना घडली होती. त्यातच बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर पाटील यांच्या हत्येचा प्रकार घडल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.