सांगली - जगातील सगळ्यात उंच समजला जाणारे एव्हरेस्ट शिखर सांगलीचे सुपुत्र व नवी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी सर केला. आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा गुरव यांचा जिद्दीचा प्रवास थरारक आणि थक्क करणारा आहे. शिवाय जगाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचूनदेखील त्यांना आनंदापेक्षा आपली आई सोबत नसल्याचे दुःख अधिक होते. एवढी मोठी मोहीम सर करणारे, महाराष्ट्र पोलीस दलातील गुरव हे तिसरे व्यक्ती ठरले आहेत. मूळचे सांगलीच्या पडवळवाडीचे सुपुत्र असणारे संभाजी गुरव यांच्याशी एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या अनुभवाबाबत 'ईटीव्ही भारत'ने खास बातचीत केली आहे.
आईला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 'एव्हरेस्ट' सर -
मूळचे पडळवळवाडीचे सुपुत्र असणारे संभाजी गुरव हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरव यांना पहिल्यापासून गिर्यारोहणाची आवड आहे. पोलीस दलात भरती होण्यापूर्वी त्यांनी गिर्यारोहनाचे धडे घेतले आहेत. पोलीस दलात भरती झाल्यानंतरही गुरव यांचा गिर्यारोहणाच्या बाबतीत श्रम सुरूच होते. एव्हरेस्टचा शिखर सर करण्याचे ध्येय बाळगून गुरव यांनी पोलीस दलात दाखल झाल्यानंतरही अथक प्रयत्न सुरूच ठेवले होते. यातूनच एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेनिंग देखील पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांना एव्हरेस्ट शिखर खुणावत होते. याच दरम्यान गेल्या वर्षी संभाजी गुरव यांच्या आईचे निधन झाले. पण आपण आपल्या आईला वाचवू शकलो नाही, याचे शल्य संभाजी यांच्या मनात घर करुन होते. आपल्या आईला एक आगळी-वेगळी श्रद्धांजली अर्पण करावी, या उद्देशाने एव्हरेस्ट मोहीम फत्ते करण्याचे संभाजी गुरव यांनी ठरवले आणि एव्हरेस्ट शिखर गाठत जगाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचून आपल्या आईला श्रद्धांजली वाहिली.
गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षराने नोंद -
14 मेपासून संभाजी गुरव यांनी काठमांडू येथून एव्हरेस्ट शिखर सर करण्याची मोहीम सुरु केली. 65 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करत 17 मे रोजी बेस कॅम्प 2 याठिकाणी पोहचले. त्यानंतर 18 मे रोजी बेस कॅम्प 3, 19 मे रोजी बेस कॅम्प 4 आणि त्यानंतर 20 मेपासून प्रत्यक्ष एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी चढाई सुरू झाली. निसर्गाची साथ आणि पोषक वातावरण यामुळे संभाजी गुरूव यांनी 22 मे रोजी अखेर एव्हरेस्ट शिखर सर करत महाराष्ट्र व मुंबई पोलीस दलाचा झेंडा फडकवला. मुंबई पोलीस दलाबरोबर सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हा सर्व प्रवास त्यांनी उणे 19 अंश सेल्सिअस तापमानाच्या वातावरणात पूर्ण केला. यापूर्वी महाराष्ट्र पोलीस दलातील आयपीएस सुहेल शर्मा आणि औरंगाबादचे पोलीस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची नोंद आहे. यामध्ये आता संभाजी गुरव यांची देखील गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षरांना नोंद झाली आहे.
हेही वाचा - राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावे - संजय राऊत