सांगली - महापुरामध्ये उद्धवस्त झालेले संसार उभे करण्यासाठी अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील शिस्तबद्ध पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करीत आहे. घरी परतणाऱ्या पूरग्रस्तांना संघाच्या माध्यमातून २० जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स वाटण्यात येणार असल्याचे आरएसएसचे समन्वयक सुनिल कुलकर्णी म्हणाले.
गेल्या २ ऑगस्टपासून महापुराने सांगली, कोल्हापूरमध्ये थैमान घातले होते. रविवारपासून महापुराचे पाणी उतरायला सुरुवात झाली आहे. मात्र, आता या महापुराने उघड्यावर टाकलेले संसार पुन्हा उभारायचे कसे? असा प्रश्न पूरग्रस्तांसमोर आहे. त्यासाठी अनेक स्तवरावरून मदत केली जात आहे. आरएसएस आणि जनकल्याण समितीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. तसेच अनेकजणांना पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. तसेच त्यांच्या निवाऱ्याची सोय केली जात आहे. शहरातील विलिंग्डन महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय जनसंघ कल्याण मदत केंद्र कार्यरत आहे. त्याठिकाणी राज्यभरातून मदत पुरवली जात असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
पाणी, ब्लांकेट्स, बिस्किट एवढेच नव्हे, तर औषध, जीवनावश्यक वस्तूंची मदत पूरग्रस्तांसाठी येत आहे. अन्नधान्यांबरोबर 20 जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट पूरग्रस्तांना देण्याचे नियोजन करण्यात आला आहे. जवळपास 5 हजार पॅकेट्स तयार करण्यात आले असून आजपासून त्याचे वितरण करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या माध्यमातून सुमारे 60 डॉक्टरांचा चमू सांगली शहरासह ग्रामीण भागात कार्यरत करण्यात आला असल्याचे आरएसएसचे समन्वयक सुनिल कुलकर्णी म्हणाले.
आरोग्य तपासणी व मोफत औषधांसाठी शिबिरे देखील आयोजित केली जाणार आहे. याठिकाणी ८ वेळा एका रुग्णाला मोफत तपासणी व औषधोपचार मिळणार आहेत. त्यासाठी कुपन तयार करण्यात आले आहेत. अनेक पातळ्यांवर आज राष्ट्रीयय स्वयंसेवक संघ पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे कुलकर्णी म्हणाले.