सांगली - भाजपने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे राज्यात भाजपला बाजूला ठेवून सरकार बनले पाहिजे, आणि त्याचे आम्ही स्वागत करू, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केली आहे. मात्र, यामध्ये शेतकरी केंद्रबिंदू या अजेंड्यावर नव्या आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत विचार करू, असे संकेतही राजू शेट्टी यांनी दिले आहेत. ते आज सांगलीमध्ये बोलत होते.
नव्याने होणाऱ्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची खूप मोठी फसगत या पाच वर्षात केली आहे. त्यामुळे भाजपला बाजूला ठेवून, हे नव सरकार स्थापन होणार असेल, तर त्याचे आम्ही नक्कीच स्वागत करू, अशी भूमिका शेट्टी यांनी जाहीर केली आहे.
तसेच नव्या आघाडीच्या सरकार स्थापनेसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम आखला जात आहे. यामध्ये शेतकरी केंद्रबिंदू असेल आणि सामान्य माणसाला रोजगार मिळणार असेल तर, या नव्या आघाडी बरोबर जाण्याचा विचार करू असेही शेट्टी यांनी सांगितले आहे. मात्र, अद्याप आघाडीत सामील होण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मित्रपक्ष म्हणून बैठकीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नसल्याचेही शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.