सांगली - जिल्ह्यातील डाळिंबाच्या दराने यंदा अवकाशाला गवसणी घातली आहे. प्रतिकिलो तब्बल 625 रुपये इतका ऐतिहासिक दर मिळाला आहे. डाळिंबाचे आगार मानल्या जाणाऱ्या आटपाडीमध्ये पार पडलेल्या सौद्यामध्ये हा विक्रमी दर मिळाला आहे. निर्यातक्षम डाळिंबापेक्षा हा दर अधिक असल्याने शेतकाऱ्यांनी फटाके वाजवून पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच आटपाडीतील डाळींब बागांची पाहणी केली होती. त्यांनादेखील येथील शेतकऱ्यांच्या डाळींब उत्पादनाचे कौतुक वाटत होते.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याच्या चोपडे येथील शेतकरी असणाऱ्या पंढरीनाथ नागणे यांच्या डाळिंबाला हा 625 रुपये उच्चांकी इतका दर मिळाला आहे. त्याच बरोबर अनकढाळ येथील शेतकरी नामदेव लक्ष्मण बंडगर यांच्या डाळिंबाला ४२५ रुपये ,नाझरा येथील शेतकरी सिध्दनाथ लक्ष्मण यमगर यांच्या डाळिंबाला ४०० रुपये आणि सांगलीच्या बलवडी येथील शेतकरी मन्सूर इनाम शेख यांच्या डाळिंबाला ५२५ रुपये असा विक्रमी दर मिळाला.
आणि या लिलावात डाळिंबांना हा विक्रमी दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली.
आवक कमी आणि मागणी जास्त-
यावेळी आटपाडी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड बोलताना म्हणाले, यंदा आटपाडी तालुक्यासह आसपास अतिवृष्टीमुळे जवळपास 80 ते 90 टक्के डाळिंबाच्या बागा वाया गेल्या आहेत. बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खूप कमी प्रमाणात डाळिंबाची आवक बाजारात होत आहे. मात्र दुसर्या बाजूला दिवाळीच्या निमित्ताने डाळिंबांना मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाला उच्चांकी दर मिळाला आहे. बुधवारी मिळालेला हा ऐतिहासिक दर आहे. विशेष म्हणजे निर्यातक्षम डाळिंबांच्या पेक्षाही स्थानिक बाजारात असलेल्या या डाळिंबाला विक्रमी दर मिळाला, ही शेतकरी आणि आमच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे.
शरद पवारांनाही आटपाडीच्या डाळिंबाची पडली होती भूरळ-
आटपाडी तालुक्यात डाळिंबांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जवळपास 80 टक्के डाळींब बागा या उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र अशाही स्थितीमध्ये तालुक्यातल्या खोंजाडवाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम डाळींब उत्पादन घेतले आहे. तेल्या, बिब्या, दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा अनेक संकटांवर मात करत खोंजाडवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबाचे यंदा भरघोस आणि उत्तम दर्जाचे उत्पादन घेतले आहे. त्याचीच पाहणी करण्या करीता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येथील डाळींब बागांची पाहणी केली होती.