सांगली - राज्य सरकार मध्ये कसल्याही संवेदना राहिली नसून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार मध्ये कोणताही समन्वय नाही,अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच आता सरकारने पोकळ सल्ले, आश्वासने, दौरे बंद करा आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा,अशी मागणीही दरेकर यांनी केली आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नुकसानीच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.
तसेच सांगली जिल्ह्यातील तडवळे गावातील तरूण शुभम जाधव अतिवृष्टीमुळे पाण्यात वाहून गेला, दौऱ्यात त्यांनी त्याच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबाचे दु:ख ऐकताना दरेकरांनाही अश्रु अनावर झाले, अतिवृष्टीतील अशा प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नसल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले.
यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा मोठं नुकसान झालेल आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन सरकारला जाग आणण्यासाठी भाजपा राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहे. आपण गेल्या चार दिवसांपासून राज्याचा दौरा करत आहोत. अनेक ठिकाणी शेतकाऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आले, अशा या नुकसानीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र या सरकारला कोणत्याही प्रकारच्या संवेदना राहिल्या नाहीत, सरकार मधले प्रत्येक मंत्री आणि नेते वेगवेगळ्या पातळ्यांवर भाष्य करत आहेत. शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटतो म्हणतात. मात्र पवार बांधावर असतात तर मुख्यमंत्री मुंबईत आणि ज्यावेळी मुख्यमंत्री बांधावर त्यावेळी पवार
मुंबईत, यामुळे या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी राज्य सरकारवर केली.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे आता पोकळ आश्वासने चालले बंद करावे आणि तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप शेताच्या बांधावर पोहोचल्यानंतर आता मुख्यमंत्री रेड कार्पेट घालून शेताची पाहणी करत आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी मुख्यमंत्र्याच्या सोलापूर दौऱ्यावरून यावेळी केली आहे.