सांगली - जिल्यातील चांदोली धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. ३४ टीएमसी पाण्याची साठवण क्षमता असणाऱ्या धरणात सध्या ५.८३ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मे महिना अजून बाकी असल्याने वारणा नदी काठच्या गावांना यामुळे पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा शिराळा तालुक्यात उन्हाळा अधिकच तीव्र आहे. यामुळे अनेक तलावातील पाणीपातळी खालावली आहे. तर तालुक्यातील चांदोली येथील वारणा धरणावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या चांदोली धरणाने तळ गाठला आहे. ३४.४० टीएमसी इतका पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात केवळ ५.८३ टीएमसी म्हणजे २१.४१ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
सध्या धरणातून वारणा नदीत पाणी दीड हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा काठावरच्या गावांवर सध्या फारसा परिणाम नाही. मात्र अजून मे महिना संपूर्ण बाकी असून धरणातील पाणी साठा मृतसंचयाखाली गेल्यास शिराळा तालुक्यासह वारणाकाठी भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे.