चंद्रपूर : ताडोबा व्याघ्रप्रकल्पात ऑनलाइन बुकिंगचा घोटाळा करणारे आरोपी ठाकूर बंधू (Thakur Brothers) यांच्या घरी आज ईडीने धाड टाकली. सकाळी ही धाड टाकण्यात आली. ठाकूर बंधू यांच्या चंद्रपुरातील सरकारनगर येथील राहत्या घरी ही धाड टाकण्यात आली. सोबत त्यांच्या मालकीच्या असलेल्या हॉटेल आणि बारची देखील झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
ठाकूर बंधूंनी केला तब्बल 13 कोटींचा घोळ : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात जंगल सफारीच्या ऑनलाइन बुकिंगसाठी संकेतस्थळ तयार करण्यात आलं होतं. या बुकिंगमधून मिळणाऱ्या पैशाचा घोळ अभिषेक ठाकूर आणि विनोद ठाकूर यांनी केल्याचा आरोप आहे. ठाकूर बंधूंनी तब्बल 13 कोटींचा घोळ केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं असताना त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आल्यानं ठाकूर बंधूनी आत्मसमर्पण केलं होतं. हे प्रकरण न्यायाप्रविष्ट असताना आज सकाळी अचानक ठाकूर बंधूंच्या घरी सकाळच्या सुमारास ईडीच्या पथकानं धाड टाकली.
ठाकूर बंधू मालकीच्या स्वाद बीअर बारवर धाड : नागपूरहून धाड टाकण्यासाठी ईडीचे पथक चंद्रपुरात दाखल झाल्याची माहिती आहे. ठाकूर बंधूंच्या सरकारनगर येथे घरी धाड टाकण्यात आली, यावेळी हे दोघेही घरी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबतच ठाकूर बंधू यांच्या मालकीच्या स्वाद बीअर बार, स्वाद कॅफे, बेकरी आणि इतर ठिकाणी देखील धाडी टाकण्यात आल्या. याचा तपास अद्यापही सुरू आहे.
ताडोबा व्यवस्थापनाने केली होती ईडी तपासाची मागणी : हा घोटाळा समोर आल्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने याचा पाठपुरावा केला होता. प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या नेतृत्वात याचा न्यायालयात पाठपुरावा सुरू होता. या दरम्यान ताडोबा व्यवस्थापनाने हे प्रकरण मोठं असून याची सखोल चौकशी होण्यासाठी ईडीकडून याचा तपास करण्याची मागणी केली होती. अखेर ताडोबा व्यवस्थापनाच्या या मागणीची दखल घेण्यात आली. आज ठाकूर बंधूंच्या घरी आणि इतर ठिकाणी ईडीने धाडी टाकून तपास सुरू केला आहे. यात ईडीच्या पथकाने काय काय जप्त केलं याची माहिती मिळू शकली नाही. यात आणखी मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत प्रकल्प संचालक डॉ. जुतेंद्र रामगावकार यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
काय आहे ताडोबाचा बुकिंग घोटाळा : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात सफारीची ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी ताडोबा-अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाऊंडेशनच्या माध्यमातून संकेतस्थळ सुरू करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार ठाकूर बंधू यांच्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनीसोबत हा करार झाला. या कंपनीच्या निगराणीखाली ऑनलाइन सफारी बुकिंग केली जात होती. करारानुसार याचे कमिशन ठाकूर बंधूंच्या कंपनीला मिळत होते. 2020 ते 2023 या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत 22 कोटी 20 लक्ष एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडं जमा करणं आवश्यक होतं. मात्र ठाकूर बंधूंच्या कंपनीने केवळ 10 कोटी 65 लाख जमा केले. यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने उर्वरित रक्कमेची मागणी केली असता ठाकूर बंधूनी ती फेटाळून लावली. यानंतर प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाण्यात ठाकूर बंधूनी केलेल्या पैशांच्या अपहाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -