सांगली - लहान मुलीशी गैरवर्तन केल्याच्या रागातून एका परप्रांतीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर येथे हा प्रकार घडला आहे. कुंदन कुमार उरावॅ, असे या बिहारी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंदन हा उरावॅ वय मूळचा जाफरगंज, बिहार येथील आहे. सध्या तो कवलापूरमध्ये राहत होता. तो जेसीबी ऑपरेटरचे काम करत होता. या ठिकाणी राहत असणाऱ्या एका लहान मुलीसोबत कुंदन कुमार याने गैरवर्तन केले होते.
या रागातून चौघांनी मंगळवारी सकाळी कुंदन याचे अपहरण करत त्याच्यावर चाकूने वार केला. ज्यामध्ये कुंदन याच्या छातीवर वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये शब्बीर शेख, अनिकेत पाटील, गणेश पाटील आणि विशाल माने या चौघा तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली आहे.
तर गेल्या २४ तासात सांगली जिल्ह्यातील खुनाची ही दुसरी घटना आहे. सोमवारी जत तालुक्यातील संख या ठिकाणी एकाचा खून झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी कवलापूरमध्ये आणखी एक घटना घडली आहे.