सांगली - हातकणंगलेचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी भर पावसात भाषण ठोकत व्यासपीठावर मंत्र्यांना बसून ठेवले. इस्लामपूर मतदार संघातील शिवसेना युतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांची प्रचार सभा वाळवा येथे आयोजीत करण्यात आली होती.
या सभेसाठी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, यांच्यासह भाजपा-सेनेचे नेते उपस्थित होते. सभेदरम्यान हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने भाषणासाठी उभे राहताच अचानक पावसाने हजेरी लावली.पाऊस सुरू झाल्याने समोर बसलेले कार्यकर्ते उठू लागले. मात्र, खासदार माने यांनी कार्यकर्त्यांसह व्यासपीठावरील सर्वांना जागेवरच बसण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - विट्यात ऐतिहासिक पालखी शर्यत सोहळा; लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
धैर्यशील मानेच्या या निर्णयामुळे व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांची चांगलीच पंचायत झाली. मंत्री सदाभाऊ खोत यांना पाऊस लागू नये, म्हणून एका उपस्थित कार्यकर्त्याने छत्री आणून दिली. मात्र, खासदार माने यांनी मंत्री खोत यांना आपण जनतेबरोबर पावसात भिजतच सभा पार पाडायची असे आवाहन केले. त्यामुळे व्यासपीठावर असणाऱ्या सर्वांना भर पावसात मानेंचे भाषण संपेपर्यंत बसून रहावे लागले. त्यांचे भाषण संपताच काही क्षणात सभा संपवण्यात आली.