सांगली - विट्यात मनसेने रेशनधान्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. पुरवठा विभागाला घेऊन मनसेने एका पोल्ट्रीच्या गोडावूनमध्ये छापा टाकत गहू आणि तांदळाची 319 पोती जप्त केली आहेत.
गोरगरिबांच्या धान्याचा काळाबाजार
रेशनधान्य दुकानातील गहू आणि तांदूळ पोल्ट्रीच्या गोडावूनमध्ये आढळून आल्याची घटना विटा याठिकाणी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा घोटाळा उघडकीस आणला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा व सचिव कृष्णा देशमुख यांना विटा येथील कराड रोडवर गोकुळ मंगल कार्यालयाजवळील एका पोल्ट्रीमध्ये रेशनधान्य ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनतर मनसेची खात्री करून तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर नायब तहसीलदार व अन्नपुरवठा अधिकारी आणि विटा पोलिसांनी सदर पोल्ट्रीच्या गोडावूनमध्ये छापा टाकला. यावेळी 221 तांदळाची व गव्हाची 98 पोती असे एकूण 319 पोती धान्य आढळून आले. हे सर्व धान्य जप्त करण्यात आले आहे.
अवैध धान्यसाठा
गोडाऊन सीलसदरचे पोल्ट्रीचे गोडावून हे तुकाराम भाऊ गायकवाड यांच्या मालकीचे असून त्यांनी हे गोडावून रामभाऊ आनंदराव सपकाळ यांना भाड्याने चालवायला दिल्याची माहिती समोर आली आहे. छाप्यानंतर धान्याबाबत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता सपकाळ ती सादर करू शकले नाहीत. त्यामुळे सदरचा धान्यसाठा अवैध असून काळाबाजार करण्याच्या दृष्टीने ठेवण्यात समोर आल्याने गोडाऊन सील करून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये विटा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती विटा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी सांगितली आहे.