सांगली - सरकारच्या तिजोरीच्या चाव्या महापुरात वाहून गेल्या आहेत का, या सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना स्मशानभूमीत जिवंत जाळायचे ठरवले आहे का, असा संतप्त सवाल माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सांगलीमध्ये पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ते बोलत होते.
सर्वपक्षीय कृती समितीचे आंदोलन
जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा महापुराने बाधित झालेल्या पूरग्रस्तांना अधिकची मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरण जाहीर करावे यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ व इस्लामपुरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी व पूरग्रस्त यात सहभागी झाले होते. सांगली शहरातील अप्पर तहसील कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. पूरग्रस्तांना पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान, पूरग्रस्त व्यापाऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्यात यावी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने अधिकची मदत देण्याचे धोरण जाहीर करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
'प्रशासन तेच मग दिरंगाई का?'
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, की 2019मध्ये सांगलीत महापूर आला होता. त्यावेळी भाजपा सरकारने तातडीची आणि सरसकट मदत केली होती. यंदाही महापुराने प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये तातडीची आणि भरीव मदत झाली पाहिजे. विशेष बाब म्हणजे मागील महापुरामध्ये मदत आणि पंचनामे करणारे प्रशासन तेच आहे, मग तरीही दिरंगाई का, असा सवाल उपस्थित करत तातडीने याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
'शेतकऱ्यांना स्मशानभूमीत जिवंत जाळणार का?'
आमदार खोत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 2019च्या महापुराचा शरद पवारांनी महाराष्ट्रातील पूर्ण भागाचा दौरा केला होता. आता या महापुरामध्ये शेतकऱ्यांना का मदत करत नाही, का शेतकऱ्यांना स्मशानात जिवंत जाळण्याचे सरकारने ठरवले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नेहमी तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारच्या तिजोरीच्या चाव्या कृष्णेच्या महापुरात वाहून गेल्या का, हे पण सांगावे, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.