सांगली - अनेक शासकीय विभागातील अधिकारी यांच्याकडून शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, यापुढे शिवसैनिकांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. तसेच 31 डिसेंबरला संचारबंदीचे कडक पालन होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे शिवसेनेचा मार्गदर्शन मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवा -
ग्रामपंचायत निवडणुका आगामी काळात पार पडत आहेत आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेची ताकद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिसली पाहिजे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ग्रामपंचायती निवडणुकीच्या माध्यमातून वाढवण्याची संधी शिवसैनिकांसमोर आहे. आघाडी बाबतीत जो निर्णय होईल, तो होईल. मात्र, सर्व शिवसैनिकांनी त्यामुळे चांगल्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये शिवसेनेला सर्वाधिक ग्रामपंचायती मिळतील. यासाठी एक दिलाने सगळ्यांनी काम करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसैनिकांना केले.
हेही वाचा - नवीन कोरोना विषाणू : प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढवावे; मास्क करा बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
शासकीय अन्याय यापुढे खपवून घेणार नाही -
राज्यात अनेक शिवसैनिकांना वेगवेगळ्या शासकीय विभागातील अधिकारयांच्याकडून अन्याय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. माझ्यावर गृहराज्यमंत्री खात्याची जबाबदारी आहे आणि माझ्या खात्यातील अधिकाऱ्यांकडून यापुढील काळात शिवसैनिकांच्या वरील होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दरेकर, कोरोनाचा नियम मनाची लहर नाही -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी वरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. याबाबत ते म्हणाले, कोरोनाचे नियम मनाची लहर नाही. दरेकर यांनी माध्यमातून पाहावे. युरोपमध्ये कोरोनाचा वेगळा संसर्ग आला आहे आणि हा धोका टाळा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेचे संरक्षणसाठी रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
31 डिसेंबरला कडक संचारबंदी -
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्व सूचना संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुळात रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर साजरा करताना संचारबंदीचे पालन करावे लागणार आहे. पोलीस दलाकडून 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दस्त पेट्रोलिंग याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्याला आमदार अनिल बाबर, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांच्यासह शिवसेना नेते व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.