सांगली - बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाकडून बंदी असल्याने जोपर्यंत निर्बंध आहेत, तोपर्यंत निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन कायद्याच्या चाकोरीत राहून निर्णय घेईल, असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीवरून दिला आहे. ते सांगलीत बोलत होते.
'...म्हणून बैलगाडा शर्यतीला परवानगी नाही'
सांगलीत भारताचा 75 व्या स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जयंत पाटीलांनी स्वातंत्र्य दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच 20 ऑगस्ट रोजी भाजपाचे आमदार व प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी येथील झरे या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचा जाहीर आयोजन केला आहे. त्यासाठी लाखांचे बक्षीस गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केला आहे. बैलगाडी शर्यतीवर बंदी असताना ही बंदी झुगारून थेट या शर्यतीचे आयोजन केले आहे. या बैलगाडी शर्यतीचे आयोजनावरून बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना सूचक इशारा दिला आहे. मंत्री पाटील म्हणाले, बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्यासाठी आपल्यालाही अनेक शिष्टमंडळे भेटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विभागातही तो प्रयत्न सुरू आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत निकाल आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीवर निर्बंध आहेत आणि जोपर्यंत निर्बंध आहेत, तोपर्यंत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी प्रशासन कोणत्याही पातळीवर परवानगी देऊ शकत नाही. बंदी असल्याने प्रशासन कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घेईल. परंतु लोकांची मागणी आहे, याला दोन्ही बाजू आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे यावर निर्बंध असल्याने अशा पद्धतीच्या शर्यतींना परवानगी देता येत नाही. तर कायद्यामध्ये दुरुस्ती बाबत राज्य सरकारच्या पातळीवर काही मार्ग निघतो का ? हे बघणे आवश्यक आहे. मात्र तोपर्यंत अशा बैलगाडी शर्यतीला परवानगी देणे शक्य नसल्याचे जयंत पाटील मत मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरेंना टोला
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यानंतर जातीयवाद वाढल्याचे केलेल्या विधानावर बोलताना, मंत्री जयंत पाटील म्हणाले, काही लोक काहीतरी बोलून आपल्याकडे लक्ष वेदण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र आपल्याला खात्री आहे, समाज याकडे दुर्लक्ष करेल, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष लगावला आहे.
हेही वाचा -...तर बैलगाडा शर्यतीसाठी माझी राजकीय आत्महत्या करण्याची तयारी - खासदार अमोल कोल्हे