सांगली - दुष्काळी भागात पोहचणाऱ्या पाण्याच्या जीवावर आधुनिक शेती करणारे भावी पिढी दुष्काळी तालुक्यात यापुढे हळूहळू निर्माण होईल, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुष्काळी भागात टेंभू सिंचन योजनाचे पोहोचणारे पाणी हे पुढच्या पंधरा-वीस वर्षाच्या भविष्याचा पाया असल्याचे मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. कवठेमहांकाळच्या आरेवाडी याठिकाणी टेंभु सिंचन योजनेच्या जलपुजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कवठेमहांकाळ तालुक्यातल्या ढालगाव सह पूर्व भागातील जवळपास आठ गावांच्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गंभीर होता. म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या पोहोचत नसल्याने, टेंभू सिंचन योजनेतून या ठिकाणी पाणी देण्याची योजना या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार, माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आखली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर या योजनेचे कामे अर्धवट अवस्थेत होती. यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी याबाबत पाठपुरावा करत अखेर टेंभू सिंचन योजना पूर्ण करत कृष्णा नदीचे पाणी ढालगाव विभागातल्या केरेवाडी, लंगरपेठ याठिकाणी आणले आहे. रविवारी या ठिकाणी पोहोचलेल्या पाण्याचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे खासदार संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुमन पाटील आदी उपस्थित होते.
'आधुनिक शेती करणारी पिढी निर्माण होईल'
याप्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, आर.आर.आबा पाटील यांचा स्वप्न आज पूर्ण होत आहे. आमदार सुमन पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे आज दुष्काळी भागात टेंभू सिंचन योजना अस्तित्वात येऊन पाणी देखील पोहोचले आहे. अशाच पद्धतीने जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी पोहोचत आहे. पोचणाऱ्या पाण्यामुळे आता या जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढेल, नवीन घरे बांधतील, इथली मुलं परदेशात शिक्षणासाठी जातील आणि परदेशातून शिकून आलेली मुलं याठिकाणी असणारी पारंपारिक शेती बदलतील. जगाच्या पाठीवर आधुनिक पद्धतीची शेती पाण्याच्या जोरावर हळूहळू निर्माण करणारी नवी पिढी आपल्या पाहायला मिळेल. टेंभु सिंचन योजनेचे पोहचणारे पाणी पुढच्या पंधरा वीस वर्षाच्या भविष्याचे विकासाचं एक छोटासा पाया आहे, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.