सांगली - कोरोनाचा बाऊ करून सरकार अधिवेशनातून पळ काढत असल्याच्या आरोपांवरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली आहे. देशात कोरोना वाढत असल्याचे त्यांना दिसत नसले तर काय म्हणावे? अशा शब्दात मुंडे यांनी टोला लगावला आहे. तसेच 1 ते 19 मार्च दरम्यान अधिवेशन होणार असल्याचे निश्चित झाल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. ते इस्लामपूरमध्ये बोलत होते.
आकडे दिसत नसतील तर काय म्हणावे
कोरोनाचा बाऊ करून राज्य सरकार अधिवेशनातून पळ काढत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला होता. यावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि खोत यांना टोला लगावला आहे.
पळ काढायला विषय काय?
राज्यासह देशाच्या जनतेच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशी भूमिका प्रत्येक सरकारची आहे. आज विरोधी पक्षाच्या कोणत्याही विषयांवर पळ काढायची भूमिका सरकारची नाही. ठरल्याप्रमाणे 1 ते 19 मार्च दरम्यान अधिवेशन होणार हें निश्चित असताना, अधिवेशन होण्यापूर्वी त्यांच्याकडे काय माहिती आहे, ज्यामुळे सरकार पळ काढणार हें काय आपल्या लक्षात येत नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.