सांगली - राज्यामध्ये विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यास परवानगी मिळाली आहे. काही तथाकथित लोक महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत देव पाण्यात घालून बसले होते, मात्र त्यांच्या प्रश्नांना यामुळे उत्तर मिळाले आहे. असे म्हणत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राजकीय संघर्ष सुरू होता. सहा महिन्याच्या आत उध्दव ठाकरे यांची आमदारपदी निवड होऊ नाही शकली, तर त्यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात येण्याची चिन्हे होती. मात्र आता केंद्रीय निवडणूक आयोगाने २१ मे रोजी राज्यातील ९ विधान परिषदेच्या जागेच्या निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य संपुष्टात आले आहे.
या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री यांनी समाधान व्यक्त केले आहे. निर्माण झालेले पेच सोडवण्यासाठी आपण केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याची मागणी केली होती. सोशल डिस्टन्सिंग आणि योग्य ती खबरदारी घेऊन निवडणूका पार पडल्या जातील अशी विनंती करण्यात आली होती, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही लोक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच, काही तथाकथित लोकांनी लोकशाहीच्या गळचेपी बद्दल राज्यपालांना पत्र दिले होते. तर, काही लोक देवही पाण्यात घालून बसले होते, मात्र त्या सर्वांना निवडणूक जाहीर झाल्यामुळे उत्तर मिळाले आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
ही निवडणुक तिन्ही पक्ष मिळून लढवतील,आणि कोरोना विरोधातील लढाई अधिक जोमाने लढवत, भविष्यात महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करेल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : तीन तारखेनंतर अधिक मोकळीक मिळणार, निर्बंध शिथिल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पण...