सांगली - संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नदीकाठी १५ जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार असून अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग नियोजनाबाबत पुढील आठवड्यात कर्नाटक सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वडनेरे समिती आणि लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या उपाय नुसार काम केले जाईल, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये आयोजित सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती आढावा बैठक प्रसंगी बोलत होते.
या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जलसंपदा मंत्री यांनी बोलताना संभाव्य पुराच्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटकमधील पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे. गत वर्षी आलेल्या पुरांचा शोध घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल सरकारला मिळाला आहे. तर वडणेरे समितीचा अहवाल स्वीकारण्यासाठी वेळ लागेल. मात्र या अहवालानुसार सरकार काम करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त करत या अहवालात कृष्णा, कोयना, पंचगंगा, दुधगंगा या नद्यांच्या खोऱ्यांबाबत माहिती दिली. या नदी पात्रांमध्ये एकत्रित विसर्ग केल्यामुळे, खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे, धरणांमध्ये साठलेल्या गाळामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, असे स्पष्ट केले.
त्याच बरोबर संभाव्य पूर स्थितीबाबत प्रशासनाकडून सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात आले. याशिवाय नदीकाठी १५ जुलैपासून एनडीआरएफची पथके तैनात होणार आहेत, तर नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे महापुराची भीती नागरिकांमध्ये आहे. पण नागरिकांना घाबरून जाऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.
अलमट्टी धरणातील विसर्ग नियोजनाबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा करणार आहोत. पुढील आठवड्यात कर्नाटकचे जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यात बैठक होईल. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही बेळगावलाही जाऊ, असेही मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - 'ईश्वर करो अन् राजू शेट्टींना दुसऱ्यांचे पण चांगले चितायची बुद्धी मिळो'
हेही वाचा - सांगलीत संततधार, वारणा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ