सांगली - पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती बाबतीत योग्य निर्णय झाला आहे. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोणतीही पदयात्रा काढण्याची गरज नसल्याचे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा प्रसंग टाळण्यासाठी पंचगंगा नदीचे पाणी बोगद्यातून सोडणे जर राजू शेट्टींना नको असेल तर ते आपण रद्द करू. पण त्यांनी हवेतले आरोप करू नये, असेही मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
मोर्चे, पदयात्रा काढण्याची गरज नाही
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्याकडून काढण्यात येणारी पंचगंगा परिक्रमा पदयात्रा व आघाडी सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांच्याकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चावरून बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना पदयात्रा काढण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना चांगली मदत करण्याचा योग्य निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोणतेही मोर्चे काढण्याची आवश्यकता नाही.
...तर प्रकल्प रद्द करू
तसेच महापुरावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी करण्यासाठी कोल्हापुरातून राजापूर बांधारा याठिकाणी बोगद्यातून पंचगंगा नदीचे पाणी सोडण्याच्या जाहीर केलेल्या प्रकल्पावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातील पूर प्रसंग टाळण्यासाठी जनहिताचा निर्णय आम्ही घेतला आहे. जर त्यांना तो प्रकल्प नको असेल, तर तो आपण रद्द करू. मात्र त्यांनी हवेत आरोप करू नये, असे मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.