सांगली - जिल्ह्यात एकही कोरोना संशयित नाही. मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यात्रा जत्रा रद्द करण्याच्या सूचना आयोजकांना देण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात परदेशातुन ७३ नागरिक आले आहेत, मात्र त्यापैकी कोणत्याही नागरिकाला कोरोना विषाणूची लागण झाली नाही, सरावाच्या तपासण्या केल्या असून त्यांच्यावर आरोग्य विभाग नजर ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत ,महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे उपस्थित होते. आम्ही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनांचे सर्व पातळ्यांवर पालन करण्याबरोबर योग्य ती खबरदारी घेत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता काही संशय असल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी चौधरी यांनी केले.
तसेच, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, जिल्ह्यात होणाऱ्या यात्रा आणि गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना संबंधित आयोजकांना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तर कोरोना विषाणूच्या बाबतीत सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरवू नये, सोशल मीडियावर पोलिसांच्या सायबर सेलच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे कोणी अफवा पसरवताना आढळल्यास त्याच्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक शर्मा यांनी दिला. तसेच चुकीच्या आणि समाजात भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरवू नयेत,असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शासनाने दिलेल्या सूचनेनुसार यात्रा आणि गर्दीचे कार्यक्रम रद्द न केल्यास संबंधित आयोजकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.