सांगली - शासकीय मदत मिळत नसल्याने संतप्त पूरग्रस्त मंगळवारी सांगलीमध्ये रस्त्यावर उतरले होते. येथील इस्लामपूर बायपास रोडवर पूरग्रस्तांनी ठिय्या देत तब्बल १ तास रास्ता रोको आंदोलन केले. अखेर जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी धाव घेऊन, मदतीचे आश्वासन दिल्यानंतर पूरग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले.
सांगलीच्या पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये दिवसेंदिवस गोंधळ वाढत चालला आहे. सानुग्रह अनुदानाच्या वाटपमध्ये झालेला गोंधळ अजून संपलेला नसताना, पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्याची ओरड अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सांगलीचे उपनगर असणाऱ्या दत्तनगर, काकानगर, कर्नाळ रोडवर गेल्या ३ दिवसांपासून पूरग्रस्त रस्त्यावरून मदतीसाठी टाहो फोडत आहेत. मात्र, पंचनामे आणि कोणतीच मदत देण्यासाठी प्रशासन अद्याप पोहोचलेले नाही. त्यामुळे मंगळवारी संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी पुन्हा एकदा रस्त्यावर येऊन इस्लामपूर बायपास रोडवर ठिय्या मांडला. यावेळी शिव-शंभु चौकात पूरग्रस्तांनी रास्ता रोको करत पुणे-इस्लामपूर-सांगली आणि नांद्रे-पलूस-सांगली मार्ग रोखून धरला होता. याठिकाणी पूरग्रस्तांनी तब्बल १ तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी धाव घेऊन पूरग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेत, त्या तातडीने सोडविण्याबाबत आश्वासन दिले. यानंतर पूरग्रस्तांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, दिवसेंदिवस सांगलीतल्या पूरग्रस्तांना प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत असल्याचे समोर येत आहे.