सांगली- राज्यातील कोरोना संकट राजकारणापलीकडील असून सत्ताधाऱ्यांनी राजकारण करु नये, असे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र, त्या दृष्टीने व्यवस्था होत नसल्याचे, मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ते सांगली येथील इस्लामपूरमध्ये बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर आहेत. इस्लामपूर येथील प्रकाश कोरोना हॉस्पिटलला त्यांनी भेट देऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. मात्र, त्यादृष्टीने उपाययोजनांमध्ये वाढ होताना दिसत, नसल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू दर जास्त आहे. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती चिंताजनक बनली आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये नियोजनाचा अभाव असून प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उपाय योजनांच्या बाबतीत प्रयत्न केले पाहिजेत. विरोधी पक्ष म्हणून कोरोना काळात सरकारवर टीका करण्यापेक्षा सकारात्मक भूमिका घेऊन जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या संकट काळात सत्ताधाऱ्यांनी सुद्धा यामध्ये राजकारण करणे योग्य नाही. जनतेला आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असे मतही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले आहे.