सांगली - मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयातुन एका आंतरराज्य टोळीतील दरोडेखोराने पलायन केले आहे. केरामसिंग मेहडा (वय- 30) असे या दरोडेखोराचे नाव आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी त्याने रुग्णालयातुन पलायन केले.
मध्यप्रेदश मधील टोळी केली होती जेरबंद -
सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 24 डिसेंम्बर 2020 रोजी सांगली मधून मध्यप्रदेश मधील दरोडेखोरांच्या टोळीला अटक केली होती. या आंतरराज्य टोळीकडून पश्चिम महाराष्ट्रात दरोडे आणि घरफोडीचे 10 पेक्षा अधिक गुन्हे उघडकीस आले होते. या प्रकरणी केरामसिंग मेहडा, उदयसिंग मेहडा आणि गुडया मेहडा यासह एका अल्पवयीन बालकास अटक करण्यात आली होती. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
कोरोना पॉझिटिव्ह असताना केले पलायन -
यातील केरमसिंग मेहडा याचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात आयसोलेशन वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी केरमसिंग याने शौचालयाचा बहाण्याने खिडकीतून पलायन केले. याघटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यानंतर सांगली पोलीस दलाकडून केरमसिंग याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली असून जिल्ह्यात नाकेबंदी करण्यात आली आहे.