सांगली - एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. सांगलीतील दत्त इंडिया संचालित वसंतदादा पाटील साखर कारखान्यासमोर यावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान आक्रमक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामुळे घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.
एकरकमी एफरआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक -
सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांकडून एकरकमी एफआरपी देण्याच्या शब्द देण्यात आला होता. मात्र, जिल्ह्यातील तीन कारखाने वगळता अन्य कारखान्यांकडून एफआरपी देण्याबाबत तडजोडीची भूमिका घेण्यात येत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत पुन्हा आंदोलन छेडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जे कारखानदार एकआरपी देणार नाहीत,
त्या कारखान्यातील ऊस टाकण्यात येणाऱ्या गव्हाणीमध्ये उड्या टाकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
10 दिवसांत एकरकमी देण्याची ग्वाही -
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखानाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, कारखाना प्रशासनाकडून यावेळी दहा दिवसांमध्ये एकरकमी एफरआर देण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उड्या टाकण्याचे आंदोलन स्थगित केले.
अन्यथा गनिमकाव्याने उड्या टाकू -
जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पावसाचा हंगाम सुरू होताना बैठकीमध्ये एकरकमी देण्याबाबत मान्य केले होते. मात्र, जिल्ह्यातल्या चार साखर कारखान्यांकडून एकरकमी देण्यात आलेली आहे. तर उर्वरित साखर कारखानदारांच्याकडून असमर्थता दर्शवत टप्प्याटप्प्याने एफरआरपी देण्याची भूमिका घेण्यात येत आहे. यापुढे जे कारखाने एफरआरपी देण्यास असमर्थता दर्शवतील, त्या कारखान्यांच्या गव्हाणीमध्ये गनिमी काव्याने उड्या टाकून जीव देण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
हेही वाचा - जळगावात कोरोना लसीकरणाचा 'ड्रायरन', 25 आरोग्य कर्मचाऱ्यांची रंगीत तालिम