सांगली - उपकाराच्या जाणीवेतून ब्रह्मनाळकर सांगलीकरांच्या मदतीला धावले आहेत. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सांगली, मिरजेच्या गरजूंना अन्न वाटप करण्यात येत आहे. महापुराच्या संकटात केलेल्या मदतीची जाण ठेवून मदत करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यामध्ये महापुराचे मोठे संकट आले होत. या संकटात सगळ्यात मोठी जीवितहानी झाली होती, ती सांगली नजीकच्या ब्रह्मनाळ या गावाची. येथील 18 लोकांचा जीव कृष्णेच्या महापुरात बुडून गेला होता. अख्खे गाव यानंतर शोकसागरात बुडाले आणि महापुराच्या विळख्यात सापडलेल्या गावाच्या मदतीसाठी राज्य धावून आले होते.
आज सांगली कोरोनाच्या संकटात सापडली असताना आता ब्रह्मणाळकर सांगलीकरांच्या मदतीला धावले आहेत. ब्रह्मणाळच्या ग्रामस्थांनी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात हजारो गोरगरिबांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
बेघर निवारा केंद्रे व परप्रांतीय कामगार निवारा केंद्रांवर अन्न वाटप करण्यात आले.
मालू हायस्कूल, निवारा केंद्र, सावली निवारा केंद्र, स्वरूप थिएटर-रेडलाईट एरिया, गोकुळनगर, रेडलाईट एरिया. आंबाचौक परप्रांतीय कामगार केंद्र, खतिब हॉल, बेघर निवारा केंद्र, मिरज, मिरज हायस्कूल निवारा केंद्र, हरीपूर रोड परप्रांतीय कामगार निवारा केंद्र, या ठिकाणी अन्न वाटप करण्यात आले. ब्रह्मनाळमधील सर्व युवक, महिला यांनी या उपक्रमात मोलाचा वाटा घेतला आहे. सामजिक बांधिलकी आणि महापुराच्या संकटात असताना केलेल्या मदतीच्या भावनेतून ब्रह्मणाळकर ग्रामस्थ ही मदत करत आहेत.