सांगली - जिल्ह्यातील आठ मतदार संघांमध्ये सोमवारी शांततेत मतदान पार पडले. या विधानसभा निवडणुकांमध्ये सांगलीतील आठ मतदारसंघांतून 68 उमेदवार उभे होते. जिल्ह्यात रविवारी पार पडलेल्या पावसाचे सावट मात्र सोमवारी मतदानावर दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात 65.95 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 70.98 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात आले होते. मात्र, परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने, मतदानाच्या आकडेवारीवर त्याचा परिणाम दिसून आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकींच्या तुलनेत यावर्षी साधारणपणे पाच टक्के कमी मतदान झाल्याचे दिसून येत आहे.
पाहूया, प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख लढती आणि झालेल्या मतदानाची टक्केवारी..
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ विरुद्ध काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील अशी दुरंगी लढत झाली. याठिकाणी 56.25 टक्के इतके मतदान झाले आहे. 2014 मध्ये याठिकाणी 59.24 टक्के इतके मतदान झाले होते.
मिरज मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार व सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे बाळासाहेब व्हनमोरे यांच्यात दुरंगी लढत पार पडली. याठिकाणी यंदा 55.13 टक्के इतके मतदान झाले. तर, 2014 मध्ये याठिकाणी 61.27 टक्के मतदान झाले होते.
तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार अजितराव घोरपडे यांच्यात काट्याची लढत झाली. याठिकाणी 67.99 टक्के मतदान झाले आहे. तर, 2014 मध्ये 76.76 टक्के मतदान झाले होते.
जत मतदारसंघात यावेळी भाजपात बंडखोरी झाली. भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे विक्रम सावंत आणि भाजपाचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांच्यात तिरंगी लढत पार पडली. याठिकाणी 64.45 टक्के मतदान झाले. तर, मागील विधानसभा निवडणुकांमध्ये याठिकाणी 68.08 टक्के मतदान झाले होते.
खानापूर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली. याठिकाणी यंदा 68.35 टक्के मतदान झाले. तर, 2014 मध्ये 73.14 टक्के इतके मतदान झाले होते.
पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार विश्वजित कदम आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात यावेळी 72.27 टक्के मतदान झाले. तर, 2014 मध्ये याठिकाणी 81.76 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचे नातू व शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी, तसेच इस्लामपूर नगरपालिकेचे भाजप नगराध्यक्ष बंडखोर निशिकांत पाटील यांच्यात तिरंगी लढत पार पडली. याठिकाणी यंदा 72.14 टक्के मतदान झाले. तर, 2014 मध्ये याठिकाणी 72.15 टक्के मतदान झाले होते.
शिराळा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजप बंडखोर उमेदवार सम्राट महाडिक यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. याठिकाणी 74.01 टक्के मतदान झाले. तर, 2014 मध्ये 78.93 टक्के मतदान झाले होते.
सांगलीतील आठ मतदारसंघापैकी शिराळा मतदार संघात सर्वाधिक 74.01 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर, मिरज मतदारसंघात सर्वात कमी 55.13 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. जवळपास सर्वच मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी कमी आहे. यामागे काहीही कारण असले, तरी मतदानाचा हा घसरलेला टक्का आता कोणत्या उमेदवाराला धक्का देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
हेही वाचा : खानापूर मतदारसंघात ६७.२५ टक्के मतदान, २०१४ च्या तुलनेत घटली टक्केवारी