सांगली - लॉकडाऊनमध्ये वाढीव वीज बिलाबाबत वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक गावातील राष्ट्रवादी आणि शिवसेना आक्रमक झाली असून संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केले. गावातील वीज वितरण कार्यालयात जावून मेणबत्या पेटवत अधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देवून गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. यावेळी गावातील राष्ट्रवादीचे नेते शहाजी गायकवाड, शिवसेनेचे धनंजय गायकवाड यांचेसह कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गावात प्रत्यक्ष रिडींग न घेता अंदाजे आकारलेल्या उलट-सुलट रिडिंगमुळे ग्राहकांना वीज बिले वाढवून आले आहेत. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी आमदार, प्रांत, परीमंडल अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाकडून योग्य दखल घेतली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. गावातील बाबासाहेब पाटील यांच्या कृषी पंपाचे बिल सुमारे दीड लाख रुपये तर ढगेवाडी येथील संदीप सावंत यांच्या घरगुती वापराचे बिल दोनदा सुमारे ६ हजार आले आहे.
कर्मचारी कधीच पेट्रोलिंग करत नाहीत, वीज पुरवठा बाबत अनियमितता, अप्रत्यक्ष रेडींग अव्वाच्या सव्वा बिले यामुळे ग्राहकांची अप्रत्यक्षपणे लूट होत आहे. वीज मीटर नादुरुस्त दर्शवून त्यांच्यावर मनमानी बिल आकारणी केली जात आहे. असे असून देखील सलग तीन चार दिवस दिवसा वीज आणि रात्री अंधार, ही परिस्थिती, यात कर्मचारी स्विच ऑफ यामुळे गावाला तीन रात्री अंधारात वाट शोधावी लागली. कंपनीच्या या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड मात्र ग्राहकांना सहन करावा लागत आहे. याबाबत राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड व उपसरपंच सौरभ पाटील यांच्या समवेत ग्राहक शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता रसाळ यांच्याकडे पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यासंदर्भात निवेदनाच्या माध्यमातून विविध मागण्या केल्या.
यात परिसरात वशी फीडवरून होत असलेल्या घरगुती वीज पुरवठा बंद करून कार्वे फिडर वरून तो वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सुधीर बुद्रुक यांनी केली. रसाळ यांनी शेतकर्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहाजी गायकवाड, सौरभ पाटील, स्वाभिमानी संघटनेचे उदय गायकवाड, सर्जेराव गायकवाड, धनंजय गायकवाड, सुधीर बुद्रुक , सचिन वंडकर, ढगेवाडीचे राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप सावंत आदि शेतकरी उपस्थित होते.