रत्नागिरी - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 50 हून अधिक सीए (सनदी लेखापाल) मोठ्या पडद्यावर अर्थसंकल्प पाहत होते. या अर्थसंकल्पाचे येथील महिला सीएंनी जोरदार स्वागत केले आहे. तसेच अर्थसंकल्पातून महिलांना भरपूर काही मिळाल्याचेही सांगितले आहे.
याबाबत रत्नागिरीतील नामवंत सीएंशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...सीएंच्या नजरेतून अर्थसंकल्प 2019 पाहण्यासाठी क्लिक करा
साधी साडी, साधा वेश आणि हातात लाल रंगाच्या कापडी फोल्डरमधून आणलेला अर्थसंकल्प, अशा अगदी साध्या ढंगात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या राजकीय इतिहासात गेल्या ४८ वर्षांनंतर पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्रिपद निर्मला सीतारामन यांच्याकडे आले. विशिष्ट बॅग घेऊन अर्थसंकल्प सादर करायला येणाऱ्या यापूर्वीच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची तीच पद्धत बाजूला ठेवून सीतारामन यांनी अत्यंत साधी साडी नेसून हातात कोणतीही बॅग न घेता अर्थसंकल्प सादर केला.
नारी तू नारायणी म्हणत त्यांनी जनधन खाते असलेल्या महिलांसाठी 5 हजार ओवरड्राफ्ट सुविधेची घोषणा केली. त्यामुळे दुर्बल घटकातील महिलांनाही मदतीचा हात पुढे करत सह्रदयता व्यक्त केली. यासोबतच महिलांसाठी 1 लाख रूपयाच्या मुद्रा लोनची व्यवस्थाही अर्थसंकल्पात करून महिलांना व्यवसायात भरारी मारण्याचे स्वप्न दाखवले आहे. यापूर्वी १९७० मध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.