रत्नागिरी - जिल्ह्यात गुरुवारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. खेड, दापोली, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरीत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला, तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.
दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पुन्हा बरसतो की काय अशी शक्यता वाटत होती. अखेर दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली. या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना या पावसामुळे थोडासा गारवा मिळाला.
वीज पडून एकाचा मृत्यू
वीज पडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील कळबंस्ते हाक्रवणेमध्ये गुरुवारी सांयकाळी सहा वाजता ही घटना घडली. मलदे वाडीतुन मजुरी करून घरी जात असताना धरणाजवळ वीज पडली व त्यात नारायण तावडे (४५) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्याला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.