रत्नागिरी - निधीखेडमधल्या लोटे येथील गोशाळेच्या 3 चारा डेपोंना भीषण आग लागून लाखो रूपयांचा शेकडो टन चारा (कडबा) आगीत जळून खाक झाला. आज पहाटे 3च्या सुमारास ही आग लागली. सकाळी 7 वाजेपर्यंत ही आग विझविण्याचे काम सुरू होते.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थानची लोटे परिसरात गोशाळा आहे. या गोशाळेत जवळपास 700 गाई आहेत. दरम्यान, आज पहाटे या गोशाळेच्या चारा डेपोला अचानक आग लागली. या आगीत 70 ते 75 ट्रक चारा जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेबाबत माहिती मिळताच लोटे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी, लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या, खेड नगर परिषदेचे अग्निशामक वाहन, गोशाळेचे विश्वस्त महेश गोवळकर, सचिन काते, सचिन आंबरे, दीपक ओकटे, बंटी साने, सुनील खरात इत्यादींनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य केले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. मात्र, यात लाखो रुपयांचा चारा जळून खाक झाला. पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. ही आग अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आली असल्याची शंका गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांनी व्यक्त केली.