रत्नागिरी- कोकणातील गणेशोत्सवाला आज सोमवारी सुरूवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वयंभू तीर्थश्रेत्र असलेल्या गणपतीपुळ्यातही श्रींच्या दर्शनासाठी आज मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या म्हणजे फक्त आजजच्याच दिवशी गणपतीपुळ्याच्या स्वयंभू देवाला थेट स्पर्श करण्याची संधी मिळते. थेट गणपतीपुळ्याच्या गाभाऱ्यात जावून आपल्या लाडक्या गणरायाला हात लावून त्याला भेटण्याची संधी मिळते.
गणपतीपुळे पंचक्रोशीत मूळचे स्थानिक कोणीही घरी गणपणी मूर्ती आणत नाहीत. आज गणपतीपुळे गावातील प्रत्येक भक्तगण देवळाच्या गाभा-यात जावून गणपतीचे दर्शन घेतो. वर्षातील हा एकच दिवस असा आहे ज्या दिवशी थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते. त्यामुळे पहाटे साडेतीन वाजल्यापासून या ठिकाणी गावक-यांनी तसेच बाहेरून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे. त्यामुळे वर्षातून केवळ एक वेळा येणाऱ्या या संधीचे सोने करण्यासाठी रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात गणेशभक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. शेकडो वर्षांपासून भाद्रपद चतुर्थीला ही परंपरा सुरु आहे. आज हजारो भक्तांनी थेट गाभाऱ्यात जात गणरायाचे आशीर्वाद घेतले.