रत्नागिरी - लॉकडाऊनमुळे आरबीआयने बँका तसेच फायनान्स कंपन्यांना कर्जाचे हप्ते सुरुवातीला तीन महिने न घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवली. त्यामुळे अनेकांनी हप्ते न भरण्याच्या सुविधेचा लाभ घेतला. मात्र सुरुवातीच्या न भरलेल्या तीन महिन्यांच्या हप्त्याच्या रकमेवर काही फायनान्स कंपन्यांकडून आव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करण्यात आली आहे. रत्नागिरीत असलेल्या एक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमधील हा प्रकार कर्जदारांनीच उघडकीस आणला आहे.
तीन महिने हप्ते न भरण्यास सवलत असतानाही तीन महिन्याच्या हप्त्यांवर भरमसाठ व्याज आकारणी करण्यात आली आहे. संपूर्ण कर्ज फेडण्यास जर 5 वर्ष मुदत असेल, तर हा 5 वर्षांचा कालावधी संपेपर्यंत तीन महिन्यांतील रकमेवर जेवढं व्याज होईल, तेवढी आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळेच पंधरा हजाराच्या हप्त्यावर जवळपास १२ हजार रुपये व्याज आकारणी करण्यात आली आहे. एका कर्जदाराच्या तीन महिन्याच्या 44 हजार 640 रक्कमेवर 34 हजार 60 रुपये व्याज आकारण्यात आलं आहे. या फायनान्स कंपनीतील मॅनेजर आणि कर्जदार यांच्यातील या व्याजाची अव्वाच्या सव्वा रक्कमेच्या मागणी संदर्भातील ऑडिओ क्लिप ईटीव्ही भारतच्या हाती लागली आहे.
याबाबत फायनान्स कंपनीकडे विचारणा केल्यावर त्यांनी मात्र सारवासरव केली, पण प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. एक्विटास स्मॉल फायनान्स बँक हे एक फक्त उदाहरण आहे. मात्र अशाच इतर फायनान्स कंपन्या किंवा बँकांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे व्याज आकारणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.