रत्नागिरी : जिल्ह्यात गेले काही दिवस कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात १ ते ८ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे. अशी घोषणा तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत केली.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५५६ तर ११७ अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. याचा प्रसार आता ग्रामीण भागापर्यंत होवू नये, तसेच ही संख्या शून्यावर आणण्याच्या दृष्टीने राज्यपातळीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.
'ब्रेक द चेन' या ऑपरेशनचे नाव असणार आहे. आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून लॉकडाऊन शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी नाईलाजाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधीही रत्नागिरीतील जनतेने प्रशासनाचे नियम पाळून चांगल्या प्रकारे सहकार्य केले होते. या लॉकडाऊनमध्ये देखील नियम पाळून जनता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल असा मला आत्मविश्वास आहे, असे सामंत यांनी सांगितले.
लॉकडाऊनमध्ये केवळ अत्याश्यक सेवा वगळता 'ब्रेक द चेन' हा पॅटर्न राबविला जाईल असे उदय सामंत यांनी सांगितले. यावेळी नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी अतिशय कडक होईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्याधिकारी मिश्रा यांनीही माहिती दिली. जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
हे लॉकडाऊन सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत राहणार आहे. यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात येणार असून जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद राहणार आहेत. या काळात संपूर्ण दुकाने, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, रिक्षा आदींना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने, रुग्णालये पशुवैद्यकीय रुग्णालय व इतर अत्यावश्यक गोष्टी सुरू राहतील.