रत्नागिरी - रत्नागिरी डेपोतील एका चालकाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात रविवारी संध्याकाळी आढळून आला. माळनाका एसटी कॉलनीच्या मागील बाजूला असलेल्या चाळीत या एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. रविवारी सायंकाळी ही घटना उघड झाली.
विवस्त्र असल्याने संशय
मृतदेहाच्या अंगावर कपडे नसल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे, की खून हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पांडूरंग संभाजीराव गडदे (37) असं या चालकाचं नाव असून ते मूळचे बिडचे आहेत.
शवविच्छेदनानंतर सत्य कळणार
पाडुरंग गडदे हे रत्नागिरीत भाड्याने रहात होते. रविवारी सकाळपासून ते घराबाहेर पडले नव्हते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शेजाऱ्यांनी पाहिला. त्यानंतर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा उघडला असता त्यांना पांडुरंग गडदे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन केल्यानंतरच पांडूरंग यांचा मृत्यु नेमका कसा झाला. हे स्पष्ट होणार आहे.