रत्नागिरी- गणेशोत्सव म्हटला की देखावे आलेच. काही देखाव्यांमधून सामाजिक संदेश दिला जातो तर काही देखाव्यांमधून आपल्या आजूबाजूला घडत असणारी सत्य स्थिती मांडली जाते. रत्नागिरीतील कुवारबाव येथील अजय वर्तक यांनी आपल्या घरी असाच एक देखावा साकारला आहे. त्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तीच्या देखाव्यातून जलप्रदूषण टाळण्याचे सांगत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गेली 11 वर्षे वर्तक कुटुंब देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम करत आहेत.
सध्या जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. मानवाकडून होत असलेल्या जलप्रदूषणामुळे विशेषतः खाडी, समुद्रातील जलचरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे समुद्री जीवांना वाचविण्यासाठी गणपती बाप्पाने धारण केलेल्या मत्स्यरूपाची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संजय वर्तक आणि त्यांच्या कुटुंबियांनी साकारली आहे. वर्तक कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची मूर्ती आपल्या आजुबाजूला मिळणा-या वस्तुंपासून तयार केलेली आहे. ही मूर्ती 12 फूट उंच असून पुठ्ठा आणि कागद यांपासून बनविण्यात आली आहे. त्यावर फणसाच्या झाडांची पाने, सुपारीच्या पानाची ईरी, कुरडुची फुले वापरण्यात आली आहेत. या देखाव्यातून जलचर आम्हालाही जगू द्या अशी आर्त विनवणी बाप्पाकडे करत आहेत. या जलप्रदूषणापासून समुद्री जीवांना वाचवण्यासाठी बाप्पाने मत्स्यरुप धारण केल्याचे वर्तक कुटुंबियांनी या देखाव्यातून दाखवत जलप्रदूषण टाळण्याचा संदेश दिला आहे.