छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : विधानसभा निवडणुकीत फेर मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. जिल्ह्यातील चार मतदारसंघातील चार पराभूत उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी केली. एकूण सहापैकी दोन जणांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. नियमानुसार ही प्रक्रिया पार पडणार असल्यानं नवीन वर्षातच ही मोजणी होईल अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. आता मतमोजणीमधून चमत्कार घडवण्याची इच्छा असणाऱ्यांना एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उमेदवारांनी केले अर्ज : विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल अनेक मतदारसंघात लागले. काही उमेदवारांना असा निकाल लागू शकत नाही असा आत्मविश्वास होता, त्यामुळं फेर मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली. संभाजीनगर निवडणूक विभागात एकूण सहा उमेदवारांनी व्हीव्हीपॅट मतमोजणी करण्याची मागणी केली. मात्र, त्यापैकी एक उमेदवार चौथ्या क्रमांकावर असल्यानं तर एका उमेदवारानं पैसे न भरल्यानं दोन अर्ज बाद करण्यात आले. तर एका मशीनवरील पडताळणी प्रक्रियेसाठी 47 हजार 200 रुपये भरावे लागतात, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
'या' उमेदवारांनी भरले इतके पैसे : नियमानुसार औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दीकी, शिवसेना उबाठा पक्षाचे बाळासाहेब थोरात, वैजापूरचे ऊबाठा पक्षाचे दिनेश परदेशी यांनी दोन यंत्रासाठी 94 हजार 400 रुपये भरले. तर पश्चिम मतदार संघातील उबाठा पक्षाचे उमेदवार राजू शिंदे यांनी सहा यंत्रांसाठी 2 लाख 83 हजार रुपये भरले. नियमाने पंधरा दिवसात आक्षेप घेणाऱ्या चार उमेदवारांचे अर्ज आल्यानं त्याबाबत तपासणी होणार असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. तर सिल्लोड मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार यांनी बनावट मतदार आणण्यात आल्याचा आरोप केलाय.
अशी होईल प्रक्रिया : मतमोजणीबाबत तक्रार आल्यानंतर त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते. त्यात उमेदवारांनी ठराविक रक्कम भरल्यानंतर साधारणतः 45 दिवसात त्यावर पूर्ण प्रक्रिया केली जाते. सुरुवातीला संबंधित मतदान केंद्रावरील मतदान मशीनवरील मतदान काढले जातात. त्यानंतर त्या मशीनवर नवीन डमी उमेदवारांच्या नावाची यादी लावून मतदान केलं जातं. केलेलं मतदान आणि मोजणी बरोबर होत आहे का ते तपासलं जातं आणि पुढे व्हीव्हीपॅट मतांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला जातो.
हेही वाचा -