रत्नागिरी - जिल्ह्यातील चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. यापैकी १९ जणांचे मृतदेह हाती आले आहे. सध्याही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) शोधमोहीम सुरूच आहे.

एनडीआरएफचे जवान, स्थानिक नागरिक तसेच काही स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तिवरे धरणाचे बांधकाम २००४ साली पूर्ण झाले होते. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात धरण खचल्याचे पत्र मिळाले होते. त्यानंतर माती आणून त्याठिकाणी उतारात पडलेला खड्डा बुजवण्यात आला होता. गेल्या १ तारखेला धरण फक्त २५ ते ३० टक्केच भरले होते. मात्र, २ तारखेला कोयना परिसरातील नौजा येथे १९० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे पाण्याची पातळी अचानक ९ मीटरने वाढली. त्यामुळे सांडवा भरून वाहू लागला. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ओली माती आणि कोरडी माती यांच्यामध्ये जो काही समन्वय साधला जातो त्यामध्ये फरक पडला आणि त्यामुळे हे धरण फुटले आहे.