रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्याचे निर्बंध असूनही त्यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. रुग्ण संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात किमान आठ दिवस कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे. यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांकडे कडक लॉकडाऊनची मागणी करणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत पत्रकार परिषेदेत यांनी दिली.
जिल्ह्यातील मृत्यूदर चिंताजनक -
कोरोनासंदर्भातील परिस्थितीबाबत रत्नागिरीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. दरम्यान कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यावरुन ८६.९८ टक्क्यावर पोहोचले आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानकारक बाब आहे. सध्या ३ हजार ३७३ बाधित उपचार घेत आहेत. मात्र मृत्यूदर ३.३३ टक्के झाला आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे.
कडक लॉकडाऊनची आवश्यकता -
सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी कडक लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. असे सर्वच अधिकाऱ्यांनी सुचविले आहे. हा पर्याय अवलंबण्याबाबत पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव सादर केला जाईल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर रत्नागिरीतील व्यापारी वर्गाशी चर्चा केली जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन त्यानंतर याची अंमलबजावणी केव्हा करायची यावर निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊनची घोषणा करण्यापुर्वी केंद्र शासनाच्या निकषानुसार नागरिकांना ४८ तास आधी कळवण्यात येईल. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. याची काळजी प्रशासन घेईल. असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या वाट्याची जीएसटीची २४ हजार कोटींची भरपाई केंद्राकडे बाकी- अजित पवार