रत्नागिरी- राज्यात शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा मुद्दा ऐरणीवर आहे. अशातच आता जिल्ह्यातील आंबा बागायतदार आक्रमक झाले आहेत. २०१५ साली आंबा बागायतदारांसाठी झालेल्या व्याजावरील कर्जमाफीचा लाभ अद्याप बागायतदारांना मिळालेला नाही. ही कर्जमाफीची रक्कम २५० कोटींच्या घरात आहे. तसेच पीकविम्या अंतर्गत आंबा या फळासाठी या योजनेचा कोणताच फायदा होत नाही. त्यामुळे पीक विम्याचा पैसा विमा कंपनीला देण्यापेक्षा राज्य आणि केंद्र सरकारने आंबा बागायतदारांच्या खात्यात जमा करण्याची विनंती आंबा बागायतदारांनी केली आहे.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या व्याजासह दोन लाखांपर्यत कर्जमाफीचा आंबा बागायतदारांना कुठलाच फायदा नाही. त्यामुळे १७ फेब्रुवारीला रत्नागिरी दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात भेट घेवून आंबा बागायतदारांच्या व्यथा मांडल्या जाणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. २०१४-१५ मध्ये अवकाळी पाऊस पडला होता. त्यावेळी आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आंबा बागायतदारांनी आंदोलने केल्यानंतर राज्य सरकारने आंबा पीक कर्जावरील ३ महिन्यांच्या व्याजाची रक्कम शासन देईल, असे जाहीर केले. तसेच कर्जाच्या रकमेचे पुनर्गठन करण्याचा निर्णय झाला. त्या कर्जावरील पहिल्या वर्षाचे व्याज शासन भरणार असून, पुढील रकमेवरील ६ टक्के व्याज शासन भरेल, असा अध्यादेश शासनाने काढला होता. त्यातील तरतुदीनुसार जाहीर केलेल्या सवलतीचा पाठपुरावा करूनही अद्याप त्याचा फायदा शेतकर्यांना मिळालेला नाही.
याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींमार्फत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही समस्यांचे गार्हाणे घातले आहे. मात्र, सर्वच यंत्रणांचे आंबा बागायतदारांकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाचे निर्णय निघाले. पण जिल्ह्यात त्याची अंमलबजावणीच होत नसल्याची खंत आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे.
हेही वाचा- पर्यटक म्हणून आले अन् धर्मप्रसारक झाले.. 'त्या' बांगलादेशींविरोधात भाजपचे निवेदन