रत्नागिरी - तिवरे धरण दुर्घटनेला आज (गुरुवारी) एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, आजही धरणफुटीग्रस्तांच्या अनेक समस्यांचे निराकरण झालेले नाही. त्यामुळे धरणफुटी ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हा विषय आपण शासन स्तरावर लावून धरू आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.
तिवरे धरण दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती सरकारकडून नेमण्यात आली होती. मात्र, या समितीचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही. याबाबत दरेकर म्हणाले, हा अहवाल पूर्ण झाला असेल तर याबाबत का कार्यवाही झाली नाही यासंदर्भात मी तपशीलवार लक्ष घालेन, असेही ते म्हणाले.
पुनर्वसन चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी प्रयत्न करतोय - आमदार निकम
तीवरे धरणफुटी ग्रस्तांच्या पुनर्वसन योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी आपण स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातलेले आहे, असे आमदार शेखर निकम म्हणाले. धरणफुटीनंतर पावसाळा, त्यानंतर निवडणुका आणि आता कोरोनामुळे बराचसा वेळ गेला. मात्र, आपण प्रारंभीपासून या प्रश्नात अधिक लक्ष दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर येथील प्रश्न मांडल्यानंतर या भागातील पायाभूत सोयी-सुविधांसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे.
धरणाच्या दुरूस्तीसाठी सुमारे साडेनऊ कोटींच्या निधीला तत्वता मान्यता मिळाली आहे. अलोरे येथील पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. गावात करण्यात येणाऱ्या पुर्नवसनाबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे. सर्वच प्रश्न सुटलेले नसले तरी जे शिल्लक आहेत, त्यावर आपले लक्ष असल्याची प्रतिक्रिया स्थानिक आमदार शेखर निकम यांनी दिली आहे.